मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू

Primary tabs

– महापौरांसह पदाधिकार्‍यांची वाहने परत
तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ जानेवारी
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबई येथे एका पत्रपरिषदेत राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच इकडे नागपूर महानगरपालिकेतही आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे महापौर प्रवीण दटके, उपमहापौर सतीश होले, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी व स्थायी समितीचे अध्यक्ष सुधीर राऊत यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांनी मनपाची वाहने प्रशासनाला परत केली. आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे.
नागपूर महानगरपालिकेचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत पत्रपरिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर करताच आज नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली. तसेच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक याआधीच जाहीर करण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता आधीपासूनच लागू असली, तरी शहरात काही बाबींसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. त्यानुसार पदाधिकार्‍यांना वाहनांचा अधिकार कायम होता. आता मात्र महानगरपालिकेच्याच निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या पदाधिकार्‍यांनी मनपाद्वारे देण्यात आलेली आपापली वाहने प्रशासनाला परत केली. महापौर प्रवीण दटके व स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत यांनी कार्यालयात येऊन आपली वाहने जमा केली आणि दुचाकीवर बसून मार्गक्रमण केले.
नागपूर शहरात ३८ प्रभागांतील १५१ जागांसाठी मनपाची ही निवडणूक होणार आहे. यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभागासाठी ही निवडणूक होत आहे. सध्या दोन सदस्यीय प्रभाग आहे, हे विशेष. एकूण ३८ प्रभागांमध्ये १५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार असल्यामुळे शेवटच्या म्हणजे ३८ व्या प्रभागातून तीनच उमेदवार निवडून द्यावे लागणार आहेत.
आज लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेदरम्यान उमेदवारांना प्रभावित करणारी कुठलीही कृती किंवा घोषणा मनपा पदाधिकारी किंवा राजकीय नेत्यांना करता येणार नाही. यंदा कदाचित एखाद्या कामाची आकस्मिक गरज पडल्यास तशा आशयाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवून परवानगी मिळाल्यानंतरच ती कामे करता येणार आहे. दरम्यान, कार्यादेश झालेली कामे सुरूच राहणार असून, नवीन कामांचे कार्यादेश सध्या तरी काढले जाणार नाहीत.
दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर ५ मार्चपर्यंत नव्या महापौराची निवड होईल. विद्यमान महापौरांचा कार्यकाळ ४ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.
मतदार याद्या प्रकाशित
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर मनपाने सार्वत्रिक निवडणुकीकरिता विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे मतदार यादी तयार केली आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी निवडणूक प्रभाग क्र. १ ते ३८ मध्ये विभागून तयार करण्यात आलेली आहे. या मतदार याद्यांचे प्रारूप १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येत आहे. १२ ते १७ जानेवारीपर्यंत नागरिकांच्या माहितीसाठी निर्देशित झोननिहाय कार्यालयीन वेळेत खालील ठिकाणी या मतदार याद्या ठेवण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मतदार याद्यांबाबत काही हरकती व सूचना असल्यास संबंधितांनी १७ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्या, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
– झोन १ (लक्ष्मीनगर) : ३६, ३७, ३८
– झोन २ (धरमपेठ) : १२, १३, १४, १५
– झोन ३ (हनुमाननगर) : २९, ३१, ३२, ३४
– झोन ४ (धंतोली) : १६, १७, ३३, ३५
– झोन ५ (नेहरूनगर) : २६, २७, २८, ३०
– झोन ६ (गांधीबाग) : ८, १८, १९, २०
– झोन ७ (सतरंजीपुरा) : ३, ४, ५, २१
– झोन ८ (लकडगंज) : २२, २३, २४, २५
– झोन ९ (आसीनगर) : २, ६, ७
– झोन १० (मंगळवारी) १, ९, १०, ११
निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन
निवडणूक कार्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांना देखील निवडणुकीशीसंबंधित कार्य ऑनलाईनच करावे लागणार आहे. तसेच खर्चाचा तपशील सादर करण्याच्या दृष्टीने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे.