डॉ. विलास डांगरे यांना सारथीचा बॅ. शेषराव वानखेडे स्मृती पुरस्कार

Primary tabs

तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ जानेवारी
सारथीचा यंदाचा बॅ. शेषराव वानखेडे स्मृती पुरस्कार तरुण भारतचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना जाहीर करण्यात आला आहे. लघुद्योग व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विदर्भातील सारथी या संस्थेचा मानपत्र वितरण सोहळा १४ जानेवारीला सायंकाळी ५.४५ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे हॉलमध्ये होणार असल्याची माहिती सारथीचे संस्थापक अमर वझलवार यांनी एका पत्रपरिषदेत दिली.
शिवाय आपापल्या क्षेत्रात कार्याची छाप पाडणार्‍यांचाही या कार्यक्रमात सन्मान केला जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आ. गिरीश व्यास, उदयोन्मुख कलावंत प्रसिद्धी आयलवार, उदयोन्मुख खेळाडू मृणाल डेहनकर, उद्योग व वाणिज्य क्षेत्रासाठी अतुलकुमार पांडे आणि हकीमुद्दीन अली, साहित्य क्षेत्रासाठी प्रा. सुरेश द्वादशीवार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फैझ फजल यांची या विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्याची माहितीही वझलवार यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एअर व्हाईस मार्शल एस. सी. चाफेकर उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी सुरेश चांडक राहतील. विदर्भातील यशस्वी व्यक्तींना भविष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आदर्श लोकांसमोर प्रस्थापित होऊन त्यांच्यापासून सर्वसामान्यांना प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने सारथीतर्फे दरवर्षी मान्यवरांचा सत्कार केला जातो. यंदा सारथीचे सत्काराचे हे २५ वे वर्ष आहे. विदर्भात जन्मलेल्या किंवा विदर्भात काही काळ घालविलेल्या व्यक्तींचा सत्कारासाठी विचार केला जातो. या सत्कारासाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज मागविले जात नाहीत. सारथी समितीच्या स्वत:च्या पद्धतीने सत्कारमूर्तींची निवड केली जाते, असेही वझलवार यांनी यावेळी सांगितले.
विशेष योगदान या सदरात सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. विलास डांगरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. होमिओपॅथी क्षेत्रात डॉ. डांगरे यांचा नावलौकिक आहे. आतापर्यंत त्यांना नागपूर भूषण, विदर्भ गौरव पुरस्कार, ज्ञानेश्‍वर पुरस्कार, मनपाचा हेडगेवार स्मृती पुरस्कार, मैत्री गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहितीही वझलवार यांनी यावेळी दिली.
पत्रपरिषदेला सारथीचे अध्यक्ष डॉ. मधुकर आपटे, सुरेश चांडक, सचिव डॉ. अनिरुद्ध वझलवार, रंजन दंडिगे, हेमंत अंबादे, प्रशांत काळे, अमित हेडा, एस. जी. देशपांडे उपस्थित होते.