व्यापार क्षेत्र आणि शिक्षण

Primary tabs

आज देशात उच्चशिक्षणाचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झाले आहे. खाजगी शिक्षण संस्था या उद्योगसमूहाच्या तत्त्वप्रणालीने चालविल्या जातात. त्यातून अपेक्षित नफा मिळावा म्हणून विविध प्रकारचे मॅनेजमेंट टेक्निक वापरले जातात. उद्योगांमध्ये स्पर्धा असल्यामुळे त्यात नावीन्य, कार्यक्षमता, कार्यकुशलता, ग्राहकांच्या गरजा आदी बाबींचे भान ठेवले जाते. जर शिक्षण आज बाजारातील वस्तू मानले जात असेल तर त्या वस्तूचा दर्जा उत्तमच असायला हवा, पण आपल्या देशातील चित्र वेगळेच आहे. असंख्य उच्चशिक्षण प्राप्त पदवीधारक कामाविना भटकत आहेत. त्यांना मिळालेले उच्चशिक्षण जुनेच साचेबद्ध पद्धतीचे असून, त्यात आधुनिक काळातील कौशल्ये दिसत नाहीत. संशोधनकार्य आणि उद्योजगता वाढविण्यासाठी उच्चशिक्षण संस्था दुर्लक्ष करतात. खरेतर काळाची गरज लक्षात घेता औद्योगिक संस्थांनाही शैक्षणिक संस्था स्थापण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांच्याद्वारेच नव्या पिढीला कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले जाऊ शकते.
आजचा विद्यार्थी केवळ डिग्री घेण्याकरिताच शिक्षण घेतो की काय, असे वाटायला लागते. त्याने कॉलेजमध्ये दिलेल्या फीच्या बदल्यात त्याला केवळ कशीबशी नोकरी मिळू शकते. त्याची संशोधनात्मक प्रवृत्ती, कौशल्य तसेच उद्योजकता यांच्या वाढीकरिता शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलीही निश्‍चित योजना आखलेली दिसत नाही. केवळ विद्यार्थ्यांना नोकरीकरिता तयार करणे, हेच उद्दिष्ट त्यांच्यासमोर असते. विद्यार्थ्यांमधील कृतिशीलता, शोधक प्रवृत्ती, नेतृत्वगुण आणि चौकस बुद्धी यांना प्रोत्साहित करणारे कुठलेही पाऊल आजच्या उच्चशिक्षणात टाकलेले दिसत नाही.
शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन ठराविक चाकोरीच्या माध्यमातून केले जाते. किती विद्यार्थी पास झाले, किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले, संस्थेला मिळालेली ग्रेड, शिक्षकांचे तसेच मॅनेजमेंेटचे शैक्षणिक विकासाकडे निरंतर लक्ष इत्यादी बाबी पाहिल्या जातात. आजच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्याकडील चाकोरीतील मूल्यमापन शैक्षणिक संस्थांना जागतिक दर्जा मिळवून देऊ शकत नाही.
पालक पैसे भरतात व विद्यार्थी ‘ग्राहक’ म्हणून शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतो व शिक्षण नावाची वस्तू खरेदी करतो; पण ही वस्तू दर्जेदार नसते. याचे बोलके उदाहरण म्हणजे जागतिकस्तरावरील यादीत पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. पहिल्या ४०० विद्यापीठांत फक्त तीनच विद्यापीठे आहेत. ५० लाख रुपये पाच वर्षांत खर्च करून डेंटिस्ट्रीचा कोर्स पूर्ण केलेला विद्यार्थी जर दरमहा १५,००० रुपयांची नोकरी करीत असेल किंवा इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून जर हा विद्यार्थी बँकेत क्लार्कची नोकरी स्वीकारीत असेल, तर आमचे शिक्षणाच्या मार्केटिंगचे मॉडेल कुचकामी ठरते. यातून स्पष्ट होते की, आमच्या शिक्षण संस्था केवळ धनी लोकांकडून पैसा गोळा करतात व मोबदल्यात त्यांना काहीच दिले जात नाही. हा एक मोठा घोटाळाच म्हटला पाहिजे.
अनेकदा पालक आणि त्यांचा पाल्य यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांमध्येही तफावत असते. मुलगा उच्चशिक्षण घेऊन मोठा व्हावा म्हणून पालक आपल्या मताप्रमाणे पैसा खर्च करून शिक्षण देतो, पण मुलाला वेगळ्याच शिक्षणाची आवड असते. म्हणजे मुलाला आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधीच दिली जात नाही. परिणाम असा होतो की, मुले आपले व्यावसायिक करिअर बदलत राहतात. ज्यांना व्यवसायात उतरण्याची हिंमत आहे ते व्यवसायात रस घेतात. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊनही काही आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळतात. सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोक संगीत क्षेत्रात शिरतात किंवा कला विभागाकडील क्षेत्र निवडतात.
एकंदरीत देशातील शिक्षणाचे मार्केटिंग अपयशी ठरले आहे. या क्षेत्रातील ‘शार्क’ मास्यांना रोखणे अवघड आहे. अधिक नुकसान होण्यापूर्वी सरकारने याप्रकरणी ठोस पाऊल उचलले पाहिजे.
– भा. शं. कुलकर्णी
८४४६०४८६३०