शिवसेना उपनेत्यांना झोपेतही मीच दिसतो : आमदार संग्राम जगताप

Primary tabs

शिवम चेमटे : प्रहार वेब टीम
अहमदनगर : आम्हाला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आमच्या पक्षात कुणीही लुडबूङ करण्याची गरज नाही. शिवसेनेच्या उपनेत्यांना उठता बसता व झोपेतही राष्ट्रवादी व आमदार संग्राम जगताप दिसतात, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली .
अहमदनगर महापालिका निवडणूकीत महापौर व उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिला. त्याचा खुलासाही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला. त्या खुलाशात शिवसेनेवर आरोप करण्यात आले आहेत. तोच धागा पकडून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका केली होती. त्याला आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत प्रतिउत्तर दिले.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना उद्देशून जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीवर करण्यात आलेले आर्थिक तडतोडीचा आरोप खोटा आहे. आधी स्वतःचे हात तपासा. शिवसेनेत सगळं काही आलबेलं आहे असं नाही. एका हाताने घेतात व दुसऱ्या हाताने देतात. आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. केडगाव व पोलिस अधिक्षक कार्यालय हल्ला प्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांनी भरपूर त्रास दिला. मंत्री फक्त निवडणूक लागली की येतात. त्यांना नगरच्या जनतेचे काही देणे घेणे नाही. सत्ता असून नगरचा विकास नाही. सिटी बस बंद आहे. सेनेचे नेते स्वतःचे खिसे भरण्याचे काम करतात, असा हल्लाच जगताप यांनी चढवला.
२५ वर्ष सत्ता उपभोगलीत, काय विकास केला जनतेला माहीती आहे . मा . बाळासाहेब ठाकरे यांनी ११ महिन्यात मंत्रीपदावरून काढले. यावरून राठोड यांनी आत्मपरिक्षण करावे . दुसऱ्याच्या पक्षाची माहिती ठेवण्याची गरज नाही, असा तिलाही जगताप यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची नगरमध्ये व जिल्ह्यात ताकद वाढत आहे. त्यामुळे सेना नेत्यांच्या पोटात दुखत आहे. आधी स्वतःचा पक्षाचा विचार करा. शिवसेनेचा महापौर झाला नाही, त्याचे शल्य त्यांच्या मनात टोचत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर उठसूट आरोप केले जात आहेत, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.