सपा – बसपाचं ठरलं ; प्रत्येकी ३८ जागा लढणार, काँग्रेसला दोन जागा सोडणार

Primary tabs

प्रहार वेब टीम
लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात प्रत्त्येक ३८ जागांवर तडजोड झाली आहे. सपा – बसपा युतीने काँग्रेससाठी २ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. बोफोर्स घोटाळ्यामुळे काँग्रेस सत्तेतून गेली आणि राफेल घोटाळ्यामुळे भाजपला सत्तेतून जावे लागेल, असे मायावती यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भाजप आणि काँग्रेस दोघेही सत्तेत आले तरी परिस्थिती सारखीच असेल. गेल्या चार वर्षात जातीयवाद वाढीस लागला आहे. हुकूमशाहीमुळे जनता त्रस्त आहे त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्याचा आम्ही निश्चय केला आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
काँग्रेसची दोन जागांवर बोळवण
मायावती आणि अखिलेश यांनी काँग्रेसची अवघ्या दोन जागांवर बोळवण केली आहे. या दोन जागा म्हणजे गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ अमेठी आणि रायबरेली असतील, असे मानले जात आहे. या जागावाटपाबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
भाजपाला धोका
समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष वेगवेगळे लढतात तेव्हा मतांची विभागणी होत नाही आणि भाजपचा विजय सुकर होतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास भाजपला मतविभागणीचा फायदा मिळणार नाही, असा अंदाज आहे. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात ७४ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.