Video : ‘आया रे सबका बाप रे, कहते उसको ठाकरे’; हे गाणे ऐकले का?

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : ‘आया रे, आया रे सबका बाप रे….कहते उसको ठाकरेऽऽऽ’…. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणाची शैली, त्यांची जरब…हे सर्व गाण्याच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे. बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष, टाळ्यांचा कडकडाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘ठाकरे’ चित्रपटातील पहिले वहिले गाणे लॉन्च झाले आहे.
चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणा-या नवाजुद्दीन सिद्दीकीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.  हे गाणे हिंदीत जरी असले तरी ढोल-ताशांचा गजर असा मराठमोळा साज गाण्याला चढवण्यात आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांची निर्मिती असलेला आणि अभिजीत पानसे दिग्दर्शीत ‘ठाकरे’ चित्रपटाविषयी प्रत्येकाच्या मनात उत्कंठा लागून आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वत्र धूमाकूळ घातला असताना हिंदी चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
शनिवारी दुपारी ताज लँडस एन्ड येथे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव यांच्या उपस्थितीत संगीत लॉन्च सोहळा पार पडला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व कसे होते, त्यांच्या एका आवाजानेच महाराष्ट्रासह देशाला कसा हादरा बसायचा, त्यांनी दिलेला शब्द ते पाळायचे, हे सर्व गाण्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे.
हे गाणे इतिहास घडवणार : उद्धव ठाकरे ‘आया रे’ गाण्याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारले असता ‘हे गाणे इतिहास घडवणार’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या गाण्याच्या रेकॉर्डींगवेळी मी स्वत: म्युझिक स्टुडिओमध्ये उपस्थित होतो. गाण्याचे शब्द, सूर, ताल ऐकता हे गाणे प्रदर्शीत होण्याची मी आतुरतेने वाट बघत असल्याचे उद्धव यावेळी म्हणाले.