ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : मराठी, हिंदी चित्रपट, रंगभूमी, जाहिरात यांच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांचे मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोदी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जात. त्यांच्या जाण्याचे कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. तर बॉलिवूडमध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वुई मेट’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. प्रधान यांनी १००हून अधीक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर मराठी रंगभूमीसह इंग्रजी रंगभूमीही त्यांनी अभिनयाने गाजवली आहे. तब्बल १८ इंग्रजी नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
किशोर प्रधान यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३६साली झाला. ‘ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनी’त मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे त्यांनी नोकरी केली. नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन.
किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धांमधून अनेक एकांकिकांमधून आणि नाटकांमधून कामे केली. मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिले मराठी नाटक सादर झाले, त्यात त्यांची भूमिका होती. पुढे दूरदर्शनच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. याकुब सईद यांच्यासमवेत सादर झालेल्या ‘हास परिहास’ कार्यक्रमात ते होते. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी त्यांची पत्नी शोभासह सादर केला.