राहुल नव्हे, मायावती पंतप्रधानपदाच्या दावेदार!

Primary tabs

प्रहार वेब टीम
अलवरः आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल, आणि राहुल गांधी नव्हे तर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावती या पंतप्रधानपदाच्या दावेदार असतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी केला आहे.

सिंह म्हणाले की, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये दुपटीने वाढ होत पक्षाला ८८ ते ९० जागापर्यंतच मजल मारता येईल. अलवर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते. भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच मायावती यांची पंतप्रधान होण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

महाआघाडीसंदर्भात ते म्हणाले की, पंतप्रधान अजूनपर्यंत दक्षिण भारत समजू शकलेले नाहीत. कारण त्यांना कोणताच दृष्टीकोन नाही. जो काँग्रेसचा संपूर्ण भारतासाठी दृष्टीकोन होता. तो मोदींकडे नाही. महाआघाडी होणार, हे स्पष्ट आहे. तीन राज्यातील पराभवानानंतर मोदींची प्रतिमा ढासळली आहे. राज्याचे नेतृत्व करणे वेगळे आणि देशाचे नेतृत्व करणे वेगळे असते, असा टोलाही त्यांनी लगावला.