लवकरच जुळणार समितचे ‘३६ गुण’

Primary tabs

आशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ अशा मराठी सिनेमातून त्यांचं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसन्मान मिळवून मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘मंटो’ पात्रांवर आधारित ‘आश्चर्य चकीत’ हा बहुचर्चित सिनेमाही सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतोय. समित कक्कडच्या धाडसाचं सर्वाकडून कौतुक केलं जात आहे. असाच एक वेगळ्या विषयावर बेतलेला ‘३६ गुण’ हा नवा चित्रपट घेऊन समित कक्कड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं लंडनमधील चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. उर्वरित गोव्यामध्ये होणार आहे. समित कक्कड फिल्म्स आणि मोहन नाडर यांच्या बिझी बी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला ‘३६ गुण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात समित कक्कड यांनी भन्नाट कुंडली जुळवल्याने हा चित्रपट जमून आलेला आहे. चित्रपटाचं लेखन हृषिकेश कोळी यांनी केलं आहे. प्रसाद भेंडे यांनी छायांकन केलं आहे. पराग संखे हे लाईन प्रोडय़ुसर आहेत.