काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी पर्व!

Primary tabs

प्रहार वेब टीम
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी खेळी खेळली. प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली, उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची धूरा दिली.  उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
 

 
प्रियांका गांधी आतापर्यंत सक्रीय राजकारणापासून दूर होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसमधले कोणतेही पद नव्हते. मात्र आता राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचे नेतृत्त्व देण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फायरब्रँड नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात तेच भाजपाचे स्टार प्रचारक असतील. त्यांच्या आक्रमक प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.

 
 
उत्तर प्रदेशात काँग्रेस लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर  लढवणार आहे. प्रियांका गांधींमध्ये  त्यांच्या आजी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधीची छबी बघितली जाते.  प्रियांका गांधीच्या सक्रिय राजकारणामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसला प्रियांका गांधीच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळेल असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.