बाळासाहेबांचे गाजलेले संवाद पुन्हा घुमणार…

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : ‘जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो आणि भगिनिंनो…’, ‘मी चूक आहे की बरोबर याचा निर्णय जनता घेईल…’ यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गाजलेले, वादग्रस्त संवाद पुन्हा घुमणार आहेत. बाळासाहेबांचा जीवनपट आगामी ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या संवादाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तविक आयुष्यातील बाळासाहेबांनी उच्चारलेले संवाद या चित्रपटात वापरण्यात आले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत निर्मित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्ष स्थापनेपासून बाळासाहेबांचा मराठी माणसांसाठीचा लढा, राम मंदिर, बाबरी मशिद प्रकरण, दक्षिण लोकांची दंगल आदी अनेक महत्त्वाच्या घटनांचा या चित्रपटात समावेश आहे. चित्रपटातील संवाद हे बाळासाहेबांच्या विविध भाषणांतून घेण्यात आले आहेत.
बाळासाहेब आणि त्यांची रोखठोक भाषणे हे समिकरणच बनले आहे. त्यांचे वादग्रस्त संवाद, बोलण्याची शैली याला वेगळीच ओळख होती. त्यामुळे वास्तविक आयुष्यात बाळासाहेबांनी उच्चारलेले संवाद या चित्रपटात वापरण्यात आले असल्याचे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांच्या शब्दांची जादूच अशी होती की, आम्हाला चित्रपटासाठी संवाद लेखकांची गरज भासली नाही. चित्रपटात त्यांचेच शब्द तितक्याच प्रखरपणे वापरण्यात आले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाळासाहेब या चित्रपटाचे संवाद लेखक आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.