nawaz sharif : शरीफ यांची प्रकृती चिंताजनक

Primary tabs

वृत्तसंस्था, लाहोरपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (वय ६९) यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असे शरीफ यांच्या डॉक्टरांनी बुधवारी सांगितले. शरीफ सध्या लाहोर येथील तुरुंगात असून हृदयाशी संबंधित विकार बळावल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. हृदयाशी संबंधित आजार बळावल्यानंतर त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केले होते. पण, वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात आणण्यात आले. 'पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी' येथील डॉक्टर म्हणाले, 'शरीफ यांची 'अतिशय चिंताजनक' नाही. पण, हृदयविकार आणखी बळावू नये, यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची नितांत गरज आहे.' शरीफ यांचे डॉक्टर अदनान खान यांनी मात्र शरीफ यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. ते म्हणाले, 'शरीफ यांच्या प्रकृतीमधील गुंतागुंतीमुळे त्यांच्यावर तुरुंगामध्ये उपचार शक्य नाहीत. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्याची गरज आहे. विशेष वैद्यकीय मंडळानेही शरीफ यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली आहे. मात्र, सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही.' शरीफ यांची कन्या मारायम यांनी वडिलांच्या प्रकृतीविषयी केवळ प्रसारमाध्यमांतून माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली असून शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी नवाझ यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यातील शरीफ यांचे वैद्यकीय अहवाल सामान्य आल्याचे विशेष वैद्यकीय मंडळाने म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट