शमी, कुलदीपसमोर न्यूझीलंडची शरणागती

Primary tabs

भारताचा ८ विकेट राखून मोठा विजय, पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी

नेपियर : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (३ बळी) आणि ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवसमोर (४ बळी) यांच्या फिरकी मा-यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि भारताने पहिली वनडे ८ विकेट राखून १४.१ षटके राखून जिंकताना पाच सामन्यांच्या क्रिकेट मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौ-यानंतर भारताच्या न्यूझीलंड दौ-याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. केन विल्यमसन आणि सहका-यांनी घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते. मात्र बुधवारच्या लढतीत भारताचे गोलंदाज सरस ठरले. अंधुक प्रकाश आणि अति सूर्यप्रकाशामुळे थोडा व्यत्यय आला तरी विराट कोहली आणि सहका-यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवत दौ-याची आश्वासक सुरुवात केली. न्यूझीलंडचा डाव ३८ षटकांमध्ये १५७ धावांमध्ये आटोपला. अंधुक प्रकाशामुळे पाहुण्यांसमोर ४९ षटकांत १५६ धावांचे आव्हान होते. भारताने दोन विकेटच्या बदल्यात ३४.५ षटकांत पार केले.
भारताच्या फलंदाजीचे वैशिष्टय़ म्हणजे डावखुरा सलामीवीर शिखर धवनला गवसलेला सूर. त्याने १०३ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याचे हे २६वे अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यातील झटपट मालिकेमध्ये अपयशी ठरलेल्या धवनच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्याने फॉर्म मिळवताना रोहित शर्मासह ४१ धावांची झटपट सलामी दिली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसह दुस-या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. संपूर्ण सामन्यातील ही सर्वाधिक भागीदारी ठरली. रोहितला (११ धावा) लवकर बाद करण्यात डग ब्रासवेलला यश आले तरी धवन आणि कोहली जोडीने आरामात विजय मिळवून दिला. विराटने ५९ चेंडूंत ३ चौकारांसह ४५ धावा केल्या. अंबती रायुडू १३ धावांवर नाबाद राहिला. भारताप्रमाणे यजमानांच्या गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. केवळ ब्रासवेल आणि कलम फग्र्युसनला विकेट मिळाली. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (६-१-१९-०) अचूक मारा केला तरी त्याला विकेट घेता आली नाही.
वास्तविक भारताचा विजय पूर्वार्धात नक्की झाला. त्याचे श्रेय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसह फिरकीपटू कुलदीप यादव आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांना जाते. शमीने सलामीवीरांना लवकर बाद करताना भारताला ‘ब्रेक थ्रु’ मिळवून दिला. कर्णधार केन विल्यमसनने जवळपास सव्वा दोन तास खेळपट्टीवर ठाण मांडताना संयमी अर्धशतक झळकावले. त्यामुळे यजमानांना दीडशेपार मजल मारली. विल्यमसनच्या ८१ चेंडूंतील ६४ धावांच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. त्याने एक बाजू लावून धरली तरी यादव आणि चहल यांनी उर्वरित सोपस्कार पूर्ण करताना प्रतिस्पध्र्याना १५७ धावांमध्ये रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. कुलदीपने ३९ धावांमध्ये ४ बळी घेतले. त्याला मोहम्मद शमी (६-२-१९-३) आणि चहल (४३-२) यांची चांगली साथ लाभली. अचूक आणि प्रभावी मारा करणा-या शमीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारताने विजयी सलामीसह न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेत १-० आघाडी घेतली. २००८ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षानंतर भारताने न्यूझीलंड भूमीत सामना जिंकला. उभय संघांमधील दुसरा सामना शनिवारी (२६ जानेवारी) माउंट मॉन्गानुइ येथे खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ३८ षटकांत सर्वबाद १५७ (विल्यमसन ६४, कुलदीप ३९-४, चहल ४३-२) वि. भारत – ३४.५ षटकांत २ बाद १५६(धवन नाबाद ७५, कोहली ४५, ब्रासवेल २३-१). निकाल : भारत ८ विकेट राखून विजयी. ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी. सामनावीर : मोहम्मद शमी.
शमीचे बळींचे ‘शतक’

नेपियर वनडेमध्ये अचूक मारा करताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वनडेतील बळींचे ‘शतक’ पूर्ण केले. ५६ सामन्यांमध्येच त्याने शंभर बळींचा आकडा पूर्ण केले. सर्वात कमी सामन्यांमध्ये बळींचे ‘शतक’ पूर्ण करणारा शमी भारताचा पहिला गोलंदाज आहे. मार्टिन गप्टील हा शमीचा १००वा बळी ठरला. शमीने शतकी मजल मारतानाच माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणला (५९ सामने) मागे टाकले. भारतातर्फे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (६५ सामने), अजित आगरकर (६७ सामने) आणि जवागल श्रीनाथ (६८ सामने) यांनी शंभरहून अधिक बळी घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जलद शंभर विकेट घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या रशीद खानच्या नावावर आहे. त्याने ४४ सामन्यांत हा पराक्रम केला.
अति सूर्यप्रकाशामुळे सामना थांबला

भारताने विजय मिळवला तरी अंधुक प्रकाश आणि अति सूर्यप्रकाशामुळे सामन्यात दोनदा व्यत्यय आला. त्यात अति सूर्यप्रकाश सामना थांबवण्यात आल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या. फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताची धावसंख्या १ बाद ४४ धावा अशी होती.
विराटने लाराला मागे टाकले
भारताचा कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक पाच धावांनी हुकले तरी ४५ धावांची खेळी करताना वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकले. १६व्या षटकात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे. ब्रायन लाराने त्याच्या कारकिर्दीत २९९ वनडे सामन्यांमध्ये ४०.४८ च्या सरासरीने १०४०५ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ५९.६८च्या सरासरीने २२०व्या सामन्यात एकूण धावसंख्या १०४३० धावांवर नेत लाराला मागे टाकले. दहा हजारहून अधिक धावा करणारा विराट हा विक्रमवीर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनीनंतरचा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे.
कोहलीला विश्रांती
कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडेसह टी-ट्वेन्टी सामन्यांतून विश्रांती दिली जाणार आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. त्याला विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे समजते. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा हा हॅमिल्टन आणि वेलिंग्टन वनडे सामन्यांसह टी-ट्वेटी मालिकेत भारताचे नेतृत्व करेल.