सेरेनाचे आव्हान संपुष्टात, जोकोविच उपांत्य फेरीत

Primary tabs

मेलबर्न : माजी विजेती अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सेरेनाचे ‘पॅकअप’ झाले तरी अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने आगेकूच करताना उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत महिला एकेरीत सेरेनाला सातव्या मानांकित चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाकडून ४-६, ६-४, ५-७ असा पराभवाचा धक्का बसला. तिस-या आणि अंतिम सेटमध्ये ५-१ अशी आघाडीवर असूनही ३७ वर्षीय सेरेनाला पराभव पाहावा लागला. या पराभवामुळे विक्रमी २४वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले.
उपांत्य फेरीत प्लिस्कोवाची गाठ चौथी मानांकित जपानची नाओमी ओसॅका हिच्याशी पडेल. पुरुष एकेरीमध्ये अव्वल मानांकित जोकोविचने अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने आठवा मानांकित जपानच्या की निशिकोरीवर ६-१, ४-१ असा विजय मिळवला. दुखापतीमुळे निशिकोरीने दुस-या सेटमध्ये माघार घेतली. मात्र तोवर जोकोविचने सामन्यावर पकड मजबूत केली होती. उपांत्य फेरीत जोकोविचसमोर फ्रान्सचा लुकास पॉउली याचे आव्हान आहे.
१६व्या मानांकित मिलास राओनिकवर चुरशीच्या लढतीत ७-६(७), ६-३, ६-७(७), ६-४ अशी मात करत त्याने मेलबर्न पार्कवर प्रथमच उपांत्य फेरी गाठली. पाॅउली याच्यापूर्वी म्हणजे २०१०मध्ये जो-विल्फ्रेड त्सोंगाने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अंतिम चार टेनिसपटूंमध्ये स्थान मिळवले होते.