निवडणूक ‘टोल फ्री’वर आता मोबाइलद्वारेही संपर्क

Primary tabs

म. टा. प्रतिनिधी, नाशिक निवडणूक, मतदान आणि मतदार या विषयीची कोणतीही माहिती सहजगत्या मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेची हेल्पलाइन बुधवारपासून मोबाइलवरही कार्यान्वित झाली. सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिक माहिती घेऊ शकणार आहेत. मतदारांना त्यांच्या शंकाचे निरसन करवून घेता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पहिल्यांदाच टोल फ्री सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १८००२५३१९५० या टोल फ्री क्रमांकावरून नागरिक निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती जाणून घेऊ शकत होते. परंतु, ही सुविधा केवळ लँडलाइन फोनद्वारेच उपलब्ध होती. ती मोबाइलद्वारे कार्यान्वित करण्यास निवडणूक शाखेला यश आले आहे. त्यामुळे आता १९५० या चार आकडी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना मतदान व निवडणूक प्रक्रीयेविषयीच्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय मांडणे शक्य होऊ लागले आहे. यासाठी एका प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून या क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबत ऑनलाइन पाठपुरावा तक्रारदार करू शकणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहा या कालावधीत नागरिक या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आणि मतदान याविषयीची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. टप्प्या टप्प्याने हा कालावधीही वाढविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट