प्रियांका मैदानात

Primary tabs

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीलोकसभा निवडणुकीची घोषणा सहा आठवड्यांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसने प्रियांका गांधी वड्रा यांच्या बहुप्रतिक्षित सक्रिय राजकारण प्रवेशाची नाट्यमय घोषणा बुधवारी केली. प्रियांकांची काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना शह देण्यासाठी त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे. या अनपेक्षित आणि नाट्यमय घोषणेमुळे काँग्रेसच्या गोटात जोश निर्माण झाला. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर केंद्रातील सत्ताधारी भाजपने, 'प्रियांकांची नियुक्ती म्हणजे राष्ट्रीय राजकारणात राहुल गांधी यांच्या अपयशाची कबुली आहे', अशी टीका केली.प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात उतरावे, अशी सर्वसामान्य काँग्रेसजनांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी बुधवारी अनपेक्षितपणे पूर्ण झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांकाच्या सक्रिय राजकारणाची घोषणा केली. सध्या मुलीच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कला असलेल्या प्रियांका गांधी येत्या १ फेब्रुवारी रोजी दिल्लीत परतणार असून, त्यानंतर त्या नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशचे राजकारण नवे नाही. त्यांच्या आई सोनिया गांधी सन १९९८मध्ये राजकारणात सक्रिय होऊन रायबरेलीमधून निवडणूक लढू लागल्या तेव्हापासून प्रियांका यांनी सोनियांच्या निवडणूक व्यवस्थापन व प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर २००४पासून अमेठीत राहुल गांधी यांच्या प्रचाराचाही सूत्रे त्यांनी हाती घेतली होती. मात्र, या दोन मतदारसंघांबाहेर प्रियांका यांनी क्वचितच प्रचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपूर यांचा समावेश असलेल्या ४० लोकसभा मतदारसंघांच्या पूर्व उत्तर प्रदेशाच्या प्रभारी म्हणून प्रियांका यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जबाबदारी सांभाळायची आहे. प्रियांका सक्रिय राजकारणात उतरतील याची अजिबात कल्पना नसलेल्या भाजपने या घडामोडीवर काहीशा क्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ????
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट