शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी; शोभा डेंचा विरोध

Primary tabs

मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे. 'कुणाला हवीत ही स्मारकं? आम्हाला शाळा आणि रुग्णालयं पाहिजेत,' असं ट्विट डे यांनी केलं आहे.काही दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील हेरिटेज वास्तूत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान राणी बागेतील एका बंगल्यात स्थलांतरित करण्यात आलं आहे. हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर काल बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादर येथील प्रस्तावित स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळानं १०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. लेखिका शोभा डे यांनी सर्वसामान्यांच्या पैशाच्या या उधळपट्टीला जोरदार आक्षेप घेतला आहे.'आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालयं हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या, एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायचा हे मी दाखवून देते,' असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं आहे. डे यांच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राज्य सरकार नेमकी कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट