मोबाइलवर व्यस्त पोलिसांवर कारवाई

Primary tabs

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूरवाहतूक पोलिस चौकात न राहता झाडाखाली मोबाइल खेळत असल्याचे दिसून येत असल्याची परखड टीका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने केली. त्यानंतर, 'पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी हयगय करणाऱ्या २३ वाहतूक पोलिसांवर कारवाई केली आहे', असे शपथपत्र विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी हायकोर्टात दाखल केले.'शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. तेव्हा पोलिस आयुक्तांनी आपले घर आधी सांभाळावे अन्यथा गंभीर नोंद घेण्यात येईल', असा आदेश न्या. रवी देशपांडे व न्या. विनय मांडके यांनी १२ डिसेंबर रोजी दिला होता. हायकोर्टाच्या या परखड टीकेनंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलिसांवर केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्यात आला. त्यानुसार, कर्तव्यात हयगय करणाऱ्या ११ वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांना वाहतूक विभागातून काढून त्यांची इतरत्र बदली केली असून, त्यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्याच्या चौकात उभा आढळून न आलेला एक वाहतूक अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांवर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबर २०१८ पर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४२ हजार ७६१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर २०१७मध्ये २० हजार ५६६ जणांवर कारवाई केली होती. यावर्षी कारवाईत वाढ झाली आहे. सन २०१७मध्ये २६५जण अपघातात दगावले होते. तर २०१८ मध्ये २५२ जणांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिस चौकात दिसत नाहीत, ते सतत मोबाइलवर बोलत असतात, त्यामुळे वाहनचालक सिग्नलचे पालन करीत नाहीत, असे हायकोर्टाने आदेशात नमूद केले होते. न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत मोबाइलवर सतत बोलणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच पोलिस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करावीत, स्कूल बसकडून होणाऱ्या वाहतूक सिग्नलच्या उल्लंघनाची नोंद करावी आणि त्याबाबत वाहतूक उपायुक्तांनी स्वतंत्र शपथपत्र दाखल करावे, असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला असल्याचे सरकारी वकील सुमंत देवपुजारी यांनी हायकोर्टाला सांगितले. महापालिकेकडे मागणीशहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना चौकात बुथ तयार करून देण्यात यावे, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येक चौकात पोलिसांना उभे राहण्यासाठी गोलाकार मार्किंग करावी, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन, नो पार्किंगची फलके लावण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर महापालिकेला उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मोकाट जनावरे आणि अल्पवयीन युवकांनी बाइक चालवण्याचे मुद्देही हायकोर्टात प्रलंबित आहेत. तेव्हा वाहतूक व्यवस्थेच्या मुद्द्यावर स्वतंत्र जनहित याचिका तयार करण्याची सूचना हायकोर्टाने न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांना केली. त्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट