डॉ. श्रीकांत कोमावार यांना दिलासा

Primary tabs

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांच्या पदाला संरक्षण देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. कोमावार यांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत कायम ठेवण्याचा आणि वेतनासह सर्व लाभ देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. डॉ. श्रीकांत कोमावार यांच्या प्राचार्य पदाला राज्य सरकारने मान्यता न दिल्याने त्यांना वयाच्या ६२ व्या वर्षी प्राध्यापक पदावरून निवृत्त होण्याचा आदेश नागपूर विद्यापीठाने दिला होता. त्यासोबतच डॉ. कोमावार यांचे वेतनही रोखण्यात आले होते. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका डॉ. कोमावार यांनी न्या. सुनील शुक्रे व न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सादर केली. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने राज्य सरकार व विद्यापीठाला नोटीस बजावली तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत प्राचार्य पदावरून डॉ. कोमावार यांना निवृत्त न करण्याचा आदेश दिला.याचिकाकर्त्यानुसार, राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार प्राध्यापकांचे निवृत्ती वय ६२ वर्ष आहे. तर प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ इतके आहे. विद्यापीठाने डॉ. कोमावार यांची विधी कॉलेजच्या प्राचार्य पदाकरिता निवड केली असली तरीही सरकारदरबारी त्यांची प्राध्यापक म्हणूनच नोंद आहे. त्यामुळे सरकारच्या नियमानुसार वयाच्या ६२ व्या वर्षीच डॉ. कोमावार हे निवृत्त होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, विद्यापीठाने त्यांना प्राचार्य पदाचा पूर्ण कार्यकाळ करण्यास अनुमती दिली. इतकेच नव्हेतर दोन वर्षांचे वेतन विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. कोमावार यांच्या प्राचार्यपदाला सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी विद्यापीठाकडून घेतलेले वेतन परत करावे, असेही निर्धारित करण्यात आले. परंतु, सरकारकडे वारंवार प्रस्ताव पाठवल्यानंतरही कोमावार यांच्या प्राचार्य पदाला मान्यता दिली नाही. त्यामुळे विद्यापीठाने सहा महिन्यांपूर्वी त्यांचे वेतन रोखले.डॉ. कोमावार यांनी निवृत्तीला मुदतवाढ देण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यावर विद्यापीठाकडून रिव्ह्यू कमेटी स्थापन करणे आवश्यक होते. परंतु, विद्यापीठाने तशी समितीच स्थापन केली नाही. त्याऐवजी १३ डिसेंबर रोजी विद्यापीठाने कोमावार यांना पत्र पाठवून ३१ जानेवारी २०१९ रोजी सेवानिवृत्त होण्याचा आदेश दिला. वास्तविकता, डॉ. कोमवार हे विधी कॉलेजचे प्रचार्य आहेत. त्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती ६५ व्या वर्षी होणे अपेक्षित आहे, असा युक्तिवाद हायकोर्टात करण्यात आला. तेव्हा हायकोर्टाने डॉ. कोमवार यांना प्राचार्य पदावर कायम ठेवण्याचा व सर्व वेतन लाभ देण्याचा आदेश दिला. कोमावर यांच्यावतीने अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली......
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट