व्हिसेरा अहवालांना जलदगती

Primary tabs

- अहवालपूर्ततेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश- अधिष्ठातांनी मागवले विलंबाचे कारण- तपासणी नियोजनाची माहिती देण्याचे आदेशम. टा. खास प्रतिनिधी, मुंबईखून, अपघात, विषबाधा किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणांतील मृत्यूमागील नेमके निदान करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात येतात. मात्र मागील सहा वर्षांतील सुमारे तीन हजार व्हिसेरा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब 'महाराष्ट्र टाइम्स' मांडली होती. या बातमीची तातडीने दखल घेत जे. जे. रुग्णालय प्रशासनाने प्रलंबित व्हिसेरा अहवालाच्या पूर्ततेचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबधित विभागप्रमुखांना दिले आहेत. हे व्हिसेरा अहवाल वेळेमध्ये पूर्ण का झाले नाहीत, यासंदर्भातील लेखी स्पष्टीकरणही अधिष्ठातांनी मागवले आहे.जे. जे. रुग्णालयातील हे व्हिसेरा अहवाल प्रलंबित असल्यामुळे पोलिसांच्या तपास कार्यामध्ये अडसर निर्माण होत होता. अनेक रुग्णांची विम्याच्या संदर्भातील प्रकरणे रखडली आहेत. मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे वा अनैसर्गिक कारणांमुळे झाला, याचे वैद्यकीय निदान न झाल्यामुळे या प्रकरणांमध्ये संबधित व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही न्याय मिळालेला नाही. व्हिसेरा अहवालाच्या संदर्भातील अनेक प्रकरणे ही न्याय वैद्यकीय कक्षेत येतात. त्यामुळे ही प्रकरणे अधिक जबाबदारीने हाताळायला हवीत, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. या विभागामध्ये व्हिसेरा तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, टिश्यू टेस्टिंग मशिनसारखी वैद्यकीय सामुग्री नसल्यामुळेही ही कामे प्रलंबित असल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे या विभागामध्ये तीन तंत्रज्ञांसह टिश्यू टेस्टिंग मशिनही देण्यात येणार आहे. वैद्यकीय विश्लेषणासाठी आलेल्या प्रत्येक बाटलीत दहा ते बारा अवयवांचे अवशेष असतात. मृत्यूचे निदान योग्य रितीने न झाल्यास अवयवांचे अतिरिक्त अवशेष घेऊन हे निदान करावे लागते. दररोज २२ ते २५ प्रकरणे रुग्णालयात व्हिसेरा तपासणीसाठी येतात. या तपासण्यांचे नियोजन योग्य प्रकारे कसे करायचे, याचे नियोजन संबधित विभागाला द्यायचे आहे. यासंदर्भातील अधिक तपशीलासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट