‘द गांधी मर्डर’चे भारतातील प्रदर्शन रद्द, निर्माता-दिग्दर्शकाला धमकीचे फोन!

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘द गांधी मर्डर’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक यांना अज्ञात लोकांकडून धमक्यांचे फोन येत असल्याने त्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
करीम त्रैदिया आणि युएई स्थित दिग्दर्शक पंकज सहगल यांनी ‘द गांधी मर्डर’ हा चित्रपट बनवला आहे. आम्ही ‘द गांधी मर्डर’ चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. इथे अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. पण दुर्दैवाने काही अज्ञात लोकांकडून मला आणि दिग्दर्शकांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्या लक्ष्मी आर. अय्यर यांनी सांगितले. चित्रपट बनवताना आम्ही कोणताही पक्षपातीपणा केला नाही. भारतीयांना आम्ही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
३० जानेवारी १९४८साली महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. या हत्येमागच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडूनही गेल्यावर्षी मंजूरी मिळाली आहे. या चित्रपटात अमेरिकन अभिनेता स्टीफन लँग आणि दिवंगत अभिनेता ओम पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.