टोलनाक्यांवरील रखडपट्टी संपणार?

Primary tabs

वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग (हायवे) 'टोलमुक्त' होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'हायवें'वरून प्रवास करताना टोल भरण्यासाठी कोठेही थांबण्याची, रांगेत बराच वेळ तिष्ठत बसण्याची आवश्यकता उरणार नाही. न थांबताच संबंधित वाहनाचा टोल कापून घेण्याची नवी योजना राबविण्याचा विचार 'नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया'चा (एनएचएआय) करीत आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या पारंपरिक टोल नाक्यांऐवजी 'एनएचएआय'तर्फे संबंधित वाहनावर 'ऑन बोर्ड युनिट' उपकरण बसविण्याची शक्यता आहे. या उपकरणाच्या माध्यमातून संबंधित वाहन राष्ट्रीय महामार्गावरून जाताना निर्धारित रकमेचा टोल वाहनचालकाच्या बँक खात्यातून आपोआप वळता करून घेतला जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बसविण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास या पद्धतीचा देशभर अवलंब करण्यात येण्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी करण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्ली ते मुंबई दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या काही वाहनांमध्ये म्युझिक सिस्टीमच्या जवळ 'ऑन बोर्ड युनिट' उपकरण बसविण्यात आले आहे. हे उपकरण थेट उपग्रहांच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. कोठेही न थांबता टोल भरण्यासाठी या उपकरणाला संबंधित वाहनचालकाच्या बँक खात्याशीही जोडले आहे. त्यामुळे संबंधित कार टोलच्या नजीक आल्यास न थांबता टोल भरता येणार आहे. या पद्धतीमुळे टोल भरण्यासाठी वाहनांना मोठमोठ्या रांगांमध्ये थांबण्याची आवश्यकता उरणार नाही. त्यामुळे प्रवासासाठी लागणारा एकूण वेळही घटण्याची शक्यता आहे. फास्टॅगमुळे टोलच्या उत्पन्नात वाढगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी होणारी गर्दी पाहता 'फास्टॅग'चा अवलंब करण्याची सूचना 'एनएचएआय'ला केली होती. 'फास्टॅग'च्या वापरामुळे टोलच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले होते. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश टोल नाक्यांवर 'फास्टॅग'चा उपयोग करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेनची सोय करण्यात आली आहे. त्यामुळेही वाहनांना टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता उरत नाही. 'रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन'च्या माध्यमातून 'फास्टॅग'चा उपयोग करण्यात येत आहे. या प्रणालीचा वापर करणाऱ्या वाहनांच्या मालकांच्या बँकेच्या खात्यातून टोलची रक्कम वळती करून घेण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मतही 'नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया'ने व्यक्त केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट