'फनेल झोन'चा विळखा !

Primary tabs

चिन्मय काळेchinmay.kale@timesgroup.com'फनेल झोन' च्या विचित्र नियमामुळे विमानतळ परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठा अडथळा आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास तर होऊ शकतो, पण त्यामध्ये उभ्या होणाऱ्या नवीन इमारतींची उंची एक इंचही वाढवता येणार नाही. 'फनेल झोन' म्हणजे विमानांच्या ये-जा करण्याच्या मार्गात एकही उंच इमारत नसावी, यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) कडक नियम आहेत. या कडक नियमामुळेच पुनर्विकास रखडलेल्या व झोनखाली आलेल्या शेकडो इमारती आणि त्यामधील हजारो नागरिकांना जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीत राहावे लागत आहे. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न नेमका देशाच्या आर्थिक राजधानीत तयार झालाच कसा?, त्याची सद्यस्थिती व उपाययोजना काय असू शकते, हे जाणून घेणे आवश्यक आहे.देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे. पण हे विमानतळ सध्या ज्या सांताक्रूझ-विलेपार्ले परिसरात आहे, तिथे आधी हे विमानतळ नव्हतेच. मुंबईसाठीचे मूळ विमानतळ जुहू. पण दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांना जपानी हल्ल्याची धास्ती वाटू लागली व त्यामुळे त्यांनी सध्याच्या विमानतळाच्या ठिकाणी अस्थायी धावपट्टी उभी केली. ही धावपट्टी उभी झाली त्यावेळी या परिसरात जुनी व पक्की घरे होती. काही महत्त्वाच्या इमारती होत्या. पार्ले टिळक विद्यालयासारख्या जुन्या शाळा होत्या. यावरूनच या भागात स्थानिक मुंबईकर रहिवासी आधी आले आणि विमानतळ नंतर, असे स्पष्ट होते. दुसऱ्या महायुद्धावेळी बांधलेल्या या धावपट्टीचेच पुढे विमानतळात रुपांतर झाले. पुढे, मुंबईसाठी हेच विमानतळ मुख्य झाले व जुहूचे विमानतळ नाममात्र राहिले. मूळ 'सांताक्रुझ विमानतळ' अशी अळख असलेल्या या विमानतळावरील विमानांच्या ये-जा संबंधीचे कडक नियमच आता येथील स्थानिक व मूळ निवासी रहिवाशांच्या जिवावर उठले आहेत.भारतात किंवा महाराष्ट्रात अन्यत्रदेखील विमानतळाच्या भोवताली अशी वस्ती आहे. पण त्या विमानतळांचा आवाका मुंबईपेक्षा फार कमी आहे. मुंबईची समस्या वेगळी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे बाहेरुन येणाऱ्या लोकांचा 'फोर्स' खूप अधिक आहे. रोज हजारोने वाढणाऱ्या येथील लोकसंख्येला राहण्याची जागा उपलब्ध करायची झाल्यास, हे शहर तीन बाजूने समुद्राने वेढले आहे. त्यामुळे आडवा विस्तार होऊ शकत नाही. मग पर्याय उरतो तो केवळ मजल्यांची संख्या वाढविण्याचा. पण हवाई वाहतुकीच्या कडक नियमांमुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या या विमानतळ परिसरातील इमारतींची उंची वाढू शकत नाही. त्यातूनच निर्माण झालेल्या 'फनेल झोन' नावाच्या या विचित्र नियमामुळे कुर्ला, कलिना, सांताक्रुझ, वाकोला, विलेपार्ले या भागातील रहिवाशांना त्यांच्या घराचा पुनर्विकासच करता येत नसल्याची स्थिती आहे. हा त्रास केवळ याच परिसरातील नाही तर, वांद्रे, पवई, विक्रोळी, मुलुंड, फोर्ट, शिवडी, वडाळा या विमानतळ क्षेत्राच्या थेट संपर्कात नसलेल्या भागातील रहिवाशांनाही होत आहे. या परिसरातील अनेकांचे उंचीसंबंधी 'ना हरकती'चे अर्ज एएआयने फेटाळून लावले आहेत. ही सर्व समस्या निर्माण झाली ती मुळात 'फनेल झोन' मुळे. हा 'फनेल झोन' म्हणजे विमानांच्या उड्डाण व खाली उतरण्याचा मार्ग. विमानांच्या उड्डाण व खाली उतरण्याचा मार्ग असल्याने हा नियम धावपट्टीच्या थेट रेषेतील इमारतींसाठीच असणे आवश्यक आहे. मुंबईला दोन धावपट्ट्या आहेत. याचा अर्थ, येथे एकूण चारच 'फनेल झोन' असणे अपेक्षित आहे. पण हवाई वाहतुकीच्या विचित्र नियमामुळे केवळ धावपट्टीच्या रेषेतच नाही तर विमानतळाच्या भोवताली ५६ किमी अंतरापर्यंत हा 'फनेल झोन' परिणामकारक असतो. याचा अर्थ, मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ५५ किमी अंतरावर एखादी इमारत, हाय मास्ट, होर्डिंग आदी उभे करायचे असल्यास त्यासाठीदेखील एएआयची आगाऊ परवानगी घ्यावी लागते. हा 'फनेल झोन' कसा ठरतो, याचे नियमदेखील विचित्र आहेत. या नियमानुसार, अक्षांश व रेखांशासह प्रत्येक मीटरगणिक इमारतीच्या उंचीची मर्यादा बदलत असते. ढोबळ मानाने सांगायचे तर, धावपट्टीच्या रेषेतील बांधकामांसाठी '१०० मीटरवर दोन टक्के', म्हणजेच धावपट्टी जेथे संपते तिथपासून १०० मीटर अंतरावर अधिकाधिक दोन मीटर बांधकामाला परवानगी असते. हेच प्रमाण एक किमी (एक हजार मीटर) अंतरासाठी २० मीटर (साधारण तीन माळ्याची इमारत) असते. यानुसार ते वाढत जाते. पण धावपट्टीच्या भोवतालच्या परिसराचा विचार केल्यास, हे प्रमाण '१०० मीटरवर १५ टक्के' असते. याचा अर्थ ज्या इमारती धावपट्टीच्या डावीकडे किंवा उजवीकडे १०० मीटरवर असतील, तेथे १५ मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामाला परवानगी आहे. त्यानुसार हे प्रमाण वाढत जाते. परंतु, या नियमातील सर्वात क्लिष्ट व तापदायक बाब अशी की, उंचीचे हे प्रमाण समुद्रसपाटीपासून ग्राह्य धरले जाते. विलेपार्ले, कुर्ला, कलिना हा परिसर समुद्र सपाटीपासून आधीच ४ ते ६ मीटर उंच आहे. काही भागातील इमारतींखाली खडक आहेत. त्यामुळे त्या भागातील इमारतींना प्रत्यक्ष बांधकाम आणखी कमी उंचीचे करावे लागत आहे.'फनेल झोन' च्या या विचित्र नियमामुळे या परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठा अडथळा आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास तर होऊ शकतो, पण त्यामध्ये उभ्या होणाऱ्या नवीन इमारतींची उंची एक इंचही वाढवता येणार नाही. या इमारती मुंबईच्या 'हार्टलॅण्ड' मध्ये असल्याने आधीच त्यांचा मूळ भूखंड छोटा आहे. त्यामुळे पुनर्विकासात सध्या असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा हवी असल्यास इमारतीची उंची वाढविण्याखेरीज पर्याय नाही. तसेच नवीन इमारत बांधून देणारा बिल्डर अथवा विकासक यांनाही बांधकामाचा खर्च भरुन काढण्यासाठी इमारत उंच करावीच लागेल. त्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्यानुसार त्यांना ३ एफएसआय प्राप्त होऊ शकतो. पण एफएसआय अधिक मिळून उपयोग काय?. कारण कितीही वाढीव एफएसआय मिळाला तरी इमारत उंच करता येणार नाही. त्यामुळेच आता एफएसआयला टीडीआरमध्ये परावर्तित करण्याचा पर्याय आला आहे. त्याचा प्रस्तावही स्थानिकांनीच तयार केला आहे. 'पुनर्विकास करताना या इमारतींची उंची सध्या आहे तितकीच असेल. त्यामुळे एफएसआय वाचेल. हा वाचलेला एफएसआय टीडीआरच्या रुपात अन्यत्र विक्री करण्याची परवानगी द्या', असे या परिसरातील रहिवाशांनी प्रस्तावात म्हटले आहे. उरलेला एफएसआय टीडीआरमध्ये रुपांतरित करण्याचा हा प्रयोग आजवर राज्यात कुठेच झालेला नाही. पण एक विशेष केस म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यांतर्गत सध्या तयार होणाऱ्या विकास नियंत्रण नियमावलीत, हे करता येणे शक्य आहे.हा प्रस्ताव 'फनेल झोन' चा मारा सहन करणाऱ्या रहिवाशांनी स्वत: राज्याच्या नगरविकास विभागाला दिला. आतापर्यंत या विषयी अनेकदा खल होऊनही मुंबई महापालिका किंवा नगरविकास विभागाने सकारात्मक हालचाली केल्याच नाहीत. आता या रहिवाशांनी स्वत: प्रस्ताव दिल्यानंतर नगरविकास विभाग सकारात्मक आहे. पण याविषयी आता डोक्यावरुन पाणी गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारने अधिक विलंब न करता टीडीआरच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करुन तसा नियम विकास नियंत्रण नियमावलीत (डीसीआर) समाविष्ट करण्याची गरज आहे. अन्यथा विलंब झाल्याने मोडकळीस आलेल्या एखाद्या इमारतीत दुर्घटना झाल्यास त्याला सरकारच अप्रत्यक्षरित्या जबाबदार असेल, हे नक्की.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट