‘ठाकरे’ स्क्रिनिंग वाद : काय म्हणाले संजय राऊत आणि अभिजीत पानसे?

Primary tabs

प्रहार वेब टीम
मुंबई : ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना कुटुंबासह बसण्यासाठी जागा न मिळाल्याने ते स्क्रिनिंग अर्धवट सोडून निघून गेले. या प्रकरणावर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. ‘अभिजीत पानसे यांना काही काम होते आणि कार्यक्रमात सगळे ये-जा करत असतात’ अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तर ‘मी हा चित्रपट बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला, बाकी कोणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न’ असल्याचे अभिजीत पानसे यांनी म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याआधी बुधवारी रात्री या चित्रपटाचे राजकीय क्षेत्रातील तसेच इतर मान्यवरांसाठी विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे चित्रपटगृह भरले होते. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना त्यांच्या कुटुंबासह बसण्यासाठी जागा न मिळाल्याने ते प्रचंड संतापले आणि स्क्रीनिंग सोडून निघून गेले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात टिवट केले आहे. ‘मी अभिजीतशी फोनवर बोललो असता तो म्हणाला की त्याने हा चित्रपट बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला आहे. बाकी कोणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न’, असे टिवट देशपांडे यांनी केले आहे. मनसेने शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे. तसेच ‘आय सपोर्ट अभिजीत पानसे’ हे हॅशटॅग वापरत त्यांनी अभिजीतला समर्थन केले आहे.