Asia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत

दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने सलामीला उभारलेल्या द्विशतकी भागीदारीने सामना जिंकताना भारतीय संघाला अजिबात अडचण आली नाही. फक्त शिखर धवनची विकेट गमावत भारतीय संघाने विजयाकरता लागणार्‍या 238 धावा 39.3 षटकात चोपून काढल्या. शिखर धवनने 114 धावा काढल्या आणि रोहित शर्मा 111 धावा काढून नाबाद राहिला. 

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम

नवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहे. तसेच विरोधी पक्षातील जोरदार हालचालीमुळे गोव्यातील राजकारण तापले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पर्रिकर हेच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. 

जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

जालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा  रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. 
जालना शहरातील मोती तलाव येथे दुपारीपासून बाप्पांचे विसर्जन सुरु झाले. दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान मोती तलावत गणपती विसर्जनासाठी आलेल्या अमोल संतोष रणमुळे हा मोती तलावतील पाण्यात उतरला, मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
तर लक्कडकोट भागातील निहाल खुशाल चौधरी (वय 26), शेखर मधुकर भदनेकर (वय 20) यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मोती तलाव येथे सुरक्षा अधिक वाढविली आहे.

राफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल व्यवहारासंदर्भातील विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीसुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अखिलेश यांनी केली आहे. 

'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'

नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे 2.60 लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग असे आजार उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्याने अपघात होतात, व त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो.