बाळाच्या नावात शिव्या नकोत

रशियन संसदेचा आदेश
मॉस्को, २४ एप्रिल 
एकनाथ, ओम किंवा षण्मुग या अर्थाची रशियन भाषेतील नावे आता रशियन व्यक्तींना ठेवता येणार नाहीत. कारण अपत्यांची नावे आकडे, चिन्ह किंवा शिव्या असलेल्या शब्दांची नको, असा कायदा रशियाची संसद ड्यूमाने मंजूर केला आहे.
आकडे, शब्दांसहित आकडे, चिन्हे, उद्गार चिन्ह हे पालकांना आपल्या अपत्यांच्या नावांमध्ये घालता येणार नाहीत, असे या कायद्यात म्हटले आहे. तसेच अश्‍लील शब्द, पद आणि पदव्या यांचाही नावांमध्ये समावेश करता येणार नाही.

स्थलांतरितांची शिबिरे म्हणजे छळछावण्याच : पोपची टीका

यहुदी संघटनेने केला वक्तव्याचा निषेध
वॉशिंग्टन, २३ एप्रिल
युरोपमध्ये आश्रय घेऊ इच्छिणार्‍या स्थलांतरितांची शिबिरे म्हणजे नाझी जर्मनीच्या काळातील छळछावण्यांसारखी आहेत, असे कॅथोलिक ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. निर्वासितांबाबत करार करून आपापल्या सीमा बंद केल्याबद्दल त्यांनी युरोपीय देशांवरही टीकास्त्र सोडले आहे.
जगभरात नाझीवाद, दहशतवाद आणि हुकूमशाही राजवटीत मारल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित एका शोकसभेत पोप फ्रान्सिस बोलत होते.

‘अंतराळा’तील बायबलच्या मालकीवरून वाद

वॉशिंग्टन, २४ एप्रिल 
अंतराळात पाठवण्यात आलेल्या दहा मायक्रोफिल्मच्या स्वरूपातील बायबलची मालकी कोणाची? हाच प्रश्‍न सध्या ओक्लाहोमा येथील एका न्यायालयात पोचला असून अमेरिकेतील दोन राज्ये या मुद्यावरून आमनेसामने आली आहेत.
नासाचे धर्मगुरू जॉन एम. स्टाऊट यांच्या कल्पनेनुसार बायबल अंतराळात नेण्यात आले होते. त्यामुळे या बायबलवर त्यांचा मुलगा जोनाथन याची मालकी आहे, असे टेक्सास राज्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे टुलसा राज्यातील लेखिका व उद्योजक कॅरोल मर्श यांनी या बायबलवर आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात ३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

पॅलेस्टाईन उपोषणकर्त्यांसमोर इस्रायलींची बार्बेक्यू पार्टी

जेरूसलेम, २३ एप्रिल 
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील संघर्षाला नवी धार आली असून दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारी एका तुरुंगात उपोषण आंदोलनात भाग घेणार्‍या निदर्शकांसमोरच इस्रायली कार्यकर्त्यांनी ‘बार्बेक्यू’ पार्टी केल्यामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे.
वेस्ट बँक येथील ओफर तुरुंगाबाहेर हा प्रकार घडला. मार्वान बार्घुती हा कार्यकर्ता गेल्या १५ वर्षांपासून इस्रायली तुरुंगात आहे. त्याने सर्वात आधी उपोषण आंदोलनाची हाक दिली.

उच्च मॅग्नेशियम पातळीमुळे अस्थिभंगाचे प्रमाण कमी

लंडन, २३ एप्रिल
अस्थिभंग (हाड फ्रॅक्चर) होण्यामुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वयोवृद्धांमध्ये जास्त आहे. मात्र, रक्तामधील मॅग्नेशियमच्या उच्च पातळीमुळे वयोवृद्ध लोकांची हाडे मोडण्याचे (फ्रॅक्चर) प्रमाण कमी होते असे एका नव्या अभ्यासात आढळून आले.