अहमदनगरात तलाव फुटल्याने ४० गावकरी पुरात अडकले

नगर तालुक्यातील अरणगाव येथील तलाव फुटल्याने वाळुंज येथील परिट वस्तीतील ४० जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत़. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील, पोलीस पथक, आर्मी पथक घटनास्थळी दाखल झाले़. रात्री उशिरापर्यंत पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

रेल्वेतर्फे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस

मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करणाऱ्या रेल्वेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच ७८ दिवसांचा बोनस देण्याचे जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या निर्णयामुळे भारतीय रेल्वेच्या १२.३० लाख कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.

चक्रीवादळाचे मेसेज करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी दिवसभर मुसळधार पावसासह अफवांचाही जोरदार पाऊस बरसला. अतिवृष्टीची धास्ती घेतलेल्या मुंबईकरांनी चक्रीवादळाच्या अफवांचाही धसका घेतला. परंतु अशा अफ‍वा पसरवणाऱ्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात पावसाचे धुमशान सुरूच

कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून सकाळी काही भागांत पावसाचा जोर कमी होता मात्र सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आजही मच्छीमारांना समुद्रात जाता आले नाही तर ठिकठिकाणी सुरक्षित असलेल्या शेकडो बोटी समुद्र शांत होण्याची वाट पाहत आहेत.

मुंबईत संततधार; नालासोपारात ४ जण वाहून गेले

मुंबईत पावसाने दाणादाण उडवली असून वसई-विरार-पालघर पट्ट्यात तुफान पाऊस कोसळत आहे. नालासोपारा येथील नेवाळे ते देसाईवाडी भागातील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.