नागरी सहकारी बँकांमध्ये २२० कोटी रुपयांचे घोटाळे

रिझव्‍‌र्ह बँकेची धक्कादायक माहिती
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्यांनी ठेवीदार, खातेदार धास्तावलेले असताना देशातील नागरी सहकारी बँकांची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील नागरी सहकारी बँकांमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये २२० कोटी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. आणखी धक्का देणारी माहिती अशी की २०१८-२०१९ या एका वर्षात १८१ घोटाळे झाले आणि हे घोटाळे तब्बल १२७.७ कोटी रुपयांचे आहेत.

कृषी क्षेत्रासाठी तब्बल २,००० कोटी रुपयांचा निधी

वापरला फक्त १०.४५ कोटी
नवी दिल्ली : २०१८-१९च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषीक्षेत्रासाठी अत्याधुनिक बाजारपेठेची साखळी वसवण्यासाठी २,००० कोटी रुपयांच्या फंडाची घोषणा करण्यात आली होती. परंतु जवळपास हा सगळा निधीच खर्च करण्यात आलेला नाही व तज्ज्ञांच्या मते शेतकरी अजूनही कालबाह्य धोरणांच्या गर्तेत अडकलेलाच आहे. कृषी मालासाठी गावपातळीवरील बाजारात शेतकरी व व्यापारी किमान नियमांच्या कक्षेत राहून व्यवहार करतील असे अपेक्षित होते. सध्याची दलालांची साखळी बाद करून नवीन यंत्रणा उभारली जाईल ज्यामुळे शेतक-यांना नफ्यातील जास्त हिस्सा मिळेल अशी अपेक्षा होती.

‘जेएनयू’मधील विद्यार्थी नेता शरजीलवर देशद्रोहाचा गुन्हा

नवी दिल्ली : हिंसेला चिथावणी देणारी भाषणे करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शरजील इमामचा व्हीडिओ व्हायरल झाले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी अलिगड पोलिसांची दोन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत.

भारताला सक्षम विरोधी पक्षाची गरज

अभिजीत बॅनर्जी यांचे मत
जयपूर : कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचे हृदय असतो. सत्ताधा-यांनाही सत्तेवर वचक राहावा, म्हणून चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. सध्याची परिस्थिती पाहता मला असे वाटते, भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

मुंबईत आढळला ‘कोरोना’चा चौथा संशयित रुग्ण

मुंबई : चीनमधील कोरोना व्हायरस भारतात, मुंबईतही पोहोचला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण आढळला आहे. या सशंयित रुग्णाला पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याआधीच तीन आणि या चौथ्या रुग्णावर डॉक्टरांकडून विशेष लक्ष ठेवले जात असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.