कोरोना रुग्णसंख्येत १०वा देश ठरला भारत

नवी दिल्ली : भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला दहावा देश ठरला. देशात रविवारी ५,६६४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण संख्या १,३४,५६८ झाली. आतापर्यंत १.३४ लाख रुग्ण असलेला इराण दहावा देश होता. मात्र, भारतात रुग्णवाढीचा वेग इतर नऊ देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. भारतात १० हजारहून १.३ लाख रुग्ण होण्यास ४२ दिवस लागले होते, तर अमेरिकेत केवळ १० दिवसांत ही संख्या वाढली. युरोपीय देशांत २२ ते २८ दिवस लागले होते.

पंतप्रधानांकडून ओडिशासाठी ५०० कोटींची मदत

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली. यामध्ये पश्चिम बंगालनंतर ते ओडिशामध्ये दाखल झाले होते. ओडिशाची पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्याच्या मदतीसाठी ५०० कोटी रुपये देण्याची जाहीर केले आहे.
यावेळी त्यांनी राज्यपाल गणेशी लाल, मुख्यमंत्री नवीन पटनाईक तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कमीत कमी जीवीतहानी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.आपण सर्व आधीच कोरोनाशी लढत आहोत.

योगी आदित्यनाथांना धमकी देणा-यास मुंबईत अटक

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली होती. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर शोध सुरू झाला. त्यानंतर, आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. कमरान अमीन खान (वय २५), असे या आरोपीचे नाव असून मुंबई एटीएसने दोन दिवसांच्या आत ही कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबर यूपी ११२ यावर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असं लिहिलं होतं. हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली होती.

२१ दिवसांत ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरा, इंग्लंडच्या न्यायालयाचे अनिल अंबानींना आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयानं त्यांना चीनच्या तिन बँकांची ७१७ दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना २१ दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी लागणार आहे. या प्रकरणात अनिल अंबानी यांची वैयक्तिक हमी आहे. यामुळे त्यांना ही रक्कम भरावीच लागेल, असं हायकोर्ट आॅफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाच्या न्यायमूर्ती नीगेल टियरे यांनी सांगितलं.

देशभरात चोवीस तासांत ६ हजार ६५४ नवे रुग्ण, १३७ मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात मागील चोवीस तासांत ६ हजार ६५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असुन, १३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर पोहचली आहे.
देशभरातील तब्बल १ लाख २५ हजार १०१ कोरोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या ६९ हजार ५९७ जणांचा व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३ हजार ७२० जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. तर, टाळेबंदीमुळे कोरोनाच्या महासाथीचा प्रादुभार्वाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.