सोने-चांदीच्या भावात घसरण (मुंबईतील भाव)

स्टॅंडर्ड सोने... रु. 27,665 (- 435) शुद्ध सोने... रु. 27,795 (- 435) तयार चांदी... रु. 55,505 (- 455)

ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी

मुंबई - परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरमध्ये सुरू ठेवलेली खरेदी आणि जागतिक बाजारपेठांतून मिळालेली सकारात्मक दिशा यांमुळे सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारातील उत्साह कायम होता. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 173 अंशांनी वधारून 17,605 अंशांवर बंद झाला. बांधकाम, औषधनिर्माण, ऊर्जा, एफएमसीजी, बॅंका आणि तेल व वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरना आज मागणी होती. धातू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर मात्र घसरले.

मारुती सुझुकीचा भर आता डिझेल मॉडेलवर

मुंबई - बाजारपेठेतील आपला हिस्सा कायम राखण्यासाठी मारुती सुझुकी आता डिझेलवर चालणाऱ्या अधिक कार बाजारात आणणार आहे. मारुतीचा बाजारपेठेतील हिस्सा सध्या चाळीस टक्‍क्‍यांनी घटला आहे. या क्षेत्रातील मंदी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे कमी होणारे उत्पादन यांमुळे हा हिस्सा घटला आहे. त्यामुळे मारुतीने आता डिझेल मॉडेलवर अधिक भर देण्याचे ठरवले आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिंझो नाकानिशी यांनी दिली. सुझुकी पॉवरट्रेनमधून दर वर्षी तीन लाख डिझेल इंजिनांचे उत्पादन होईल आणि फियाट इंडियाशी झालेल्या करारानुसार तीन वर्षांत एक लाख डिझेल इंजिने विकत घेतली जातील, असे त्यांनी नमूद केले.

पेच लक्षात घेऊन करसवलती वाढवा

नवी दिल्ली - जागतिक आर्थिक पेच लक्षात घेऊन सध्याची कररचना तशीच ठेवावी आणि विकासदर वाढवण्यासाठी करसवलत वाढवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री सध्या अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत असून, आज झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. आरोग्यसेवा क्षेत्राला सेवाकरातून बाहेर ठेवावे आणि किमान पर्यायी कराचे (मॅट) सुसूत्रीकरण करावे, अशाही मागण्या करण्यात आल्या. विमानवाहतूक, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांना उद्योगांचा दर्जा द्यावा. मालमत्ता आणि सेवाकराची (जीएसटी) त्वरित अंमलबजावणी करावी आणि निर्यातदारांना व्याजदर सवलतीची योजना 31 मार्च 2013 पर्यंत कायम ठेवावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.

चांदीत वाढ, सोन्यात घट (मुंबईतील भाव)

स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,100 (-15) शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,230 (-15) चांदी (एक किलो) : रु. 55,960 (+135) परकी चलन डॉलर : रु. 48.96 पौंड : रु. 77.11 युरो : रु. 65.47 येन (100) : रु. 65.14

टेलिनॉर कंपनी भारतातून बाहेर पडण्याची शक्‍यता

ओस्लो - टू जी गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर टेलिनॉर ही नॉर्वेतील कंपनी आता भारत सोडण्याची शक्‍यता आहे. कंपनीचे परवाने रद्द झाल्यामुळे कंपनी नवीन नियम तयार होण्याची वाट पाहत बसणार नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रेडरिक बकसास यांनी सांगितले. &nbsp टेलिनॉर कंपनीने युनिटेक या बांधकाम क्षेत्रातील कंपनीसमवेत युनिनॉर ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीला मिळालेले 22 परवाने सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले आहेत. आता युनिनॉरला चार महिने कामकाज चालवता येणार आहे. मात्र, त्यानंतर नवीन नियमांतूनच कंपनीला सामोरे जावे लागणार आहे.

सोने, चांदीच्या भावांत घट

स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,115 (-75) शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,245 (-75) चांदी (एक किलो) : रु. 55,825 (- 175) --- अंड्यांचा भाव (एनईसीसी) शंभर नगांचा भाव : रु. 257 --- ब्रोमार्क जिवंत (एक किलो) : रु. 74 ड्रेस्ड (एक किलो) : रु. 100 ----- परकी चलन डॉलर : रु. 49.12 पौंड : रु. 77.83 युरो : रु. 64.61 येन (100) : रु. 64.55

सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकाची आगेकूच सुरू

मुंबई - भारती एअरटेलच्या शेअरमध्ये आलेली तेजी, माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि कॅपिटल गुड्‌स क्षेत्रातील शेअरची झालेली खरेदी आणि जागतिक बाजारपेठेतून मिळालेली सकारात्मक दिशा यांमुळे शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 131 अंशांनी वधारून 17,431.85 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र 34.20 अंशांनी वधारून 5,269.90 अंशांवर बंद झाला. टू-जी गैरव्यवहार प्रकरणातील निकालांच्या पार्श्‍वभूमीवर भारती एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांच्या शेअरमध्ये अनुक्रमे 6.88 आणि 2.68 टक्‍क्‍यांची वाढ झाली.

ऑनलाइन प्रशिक्षणाचा वाढता ट्रेंड

मुंबई - अभियांत्रिकी क्षेत्रात ऑनलाइन स्वयंप्रशिक्षणाचे वाढते महत्त्व असल्याचे मत टाटा टेक्‍नॉलॉजिजने मांडले आहे. टाटा टेक्‍नॉलॉजिज ही कंपनी अभियांत्रिकी सेवा आउटसोर्सिंग क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. कंपनीने आयगेट आयटी या ऑनलाइन स्वयंप्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रसार देशभर करायचे ठरवले आहे. 2010 मधील आकडेवारीनुसार एकूण कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने केले गेल्याचे उघड झाले आहे.

मौल्यवान धातूच्या वायद्यांवर करआकारणीचे स्वागत

मुंबई - केंद्र सरकारने मौल्यवान धातूंच्या वायद्यांवर कर आकारणी करण्याचे ठरवले आहे. सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने (जीजेएफ) याचे स्वागत केले आहे. जीजेएफने याविषयीची सूचना अर्थसंकल्पपूर्व सूचनांमध्ये केली होती. यावर गेले काही महिने सरकारबरोबर चर्चाही सुरू होती. मौल्यवान धातूंचे वायदे केले गेले तर त्यांचे भविष्यातील भाव अनावश्‍यक वाढतात. यामुळे खऱ्या ग्राहकाचा तोटा होतो आणि त्याला हे मौल्यवान धातू महाग मिळतात. त्याच वेळी त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तितकी नसते.

बुलडाणा अर्बन पुणे विभागात नवीन 12 शाखा

पुणे - बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पुणे विभागात सध्या 13 शाखा कार्यरत असून, पुणे जिल्ह्यात आळंदी, शिक्रापूर, कोथरूड, हडपसर, वारजे व सिंहगड रोड, सातारा जिल्ह्यात वाई, सांगली जिल्ह्यात कडेगाव, विटा व कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी व जयसिंगपूर व कोल्हापूर शहरात सराफा बाजार अशा 12 नव्या शाखा सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राधेश्‍याम चांडक (भाईजी) व मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी दिली आहे. या सर्व शाखा प्रारंभापासूनच कोअर बॅंकिंग प्रणालीने जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्व ग्राहकांना बुलडाणा अर्बनच्या कुठल्याही शाखेशी व्यवहार करणे सोईचे होणार आहे.

इंडसइंड बॅंकेच्या तीन नव्या सेवा

मुंबई - इंडसइंड बॅंकेने तीन नव्या सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये कॅश ऑन मोबाईल, डायरेक्‍ट कनेक्‍ट आणि क्विक रिडिम सर्व्हिस या सेवांचा समावेश आहे. गेल्या वर्षी बॅंकेने चॉइस मनी एटीएम, चेक ऑन चेक आणि 365 डेज बॅंकिंग या सेवा सुरू केल्या होत्या. एकाच दिवशी तीन सेवा करण्याचे सूत्र या वर्षीही बॅंकेने पाळले आहे. कॅश ऑन मोबाईल सुविधेमुळे ग्राहक मोबाईलच्या साह्याने पैशाची देवाणघेवाण करू शकेल. यासाठी ग्राहकाला मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. पैसे घेणाऱ्याचे मोबाईल ऍप्लिकेशन वापरून हा व्यवहार होऊ शकणार आहे.

बजाज डिस्कव्हरची विक्री दहा लाखांच्याही पुढे

पुणे - गेल्या तीन वर्षांत बजाज डिस्कव्हर या दुचाकीने दहा लाखांची विक्री गाठून उच्चांक स्थापन केला आहे. "डिस्कव्हर'ने एकूण 55 टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. बाइकच्या या कामगिरीत महाराष्ट्राचा तब्बल 40 टक्के हातभार असून, या राज्यात "डिस्कव्हर'ने चार लाखांची संख्या पार केली आहे. "डिस्कव्हर'च्या 100, 125 व 150 सीसी या तीन श्रेणीतील दुचाकींना ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रामध्ये 125 सीसी श्रेणीतील दुचाकीची सर्वाधिक विक्री झाली आहे.

ऑनलाइन रिटेलमध्ये ऍमेझॉन डॉट कॉमचे पदार्पण

सिऍटल - ऍमेझॉन डॉट कॉम या जगप्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग स्टोअरने भारतीय आवृत्ती आज (गुरुवार) सुरू केली. जंगली डॉट कॉम (junglee.com) असे भारतीय वेबसाइटचे नाव आहे. जगभरातील चौदा हजार ब्रॅन्ड्‌सची 1.2 कोटी उत्पादने भारतीय आवृत्तीत उपलब्ध असतील, असे "ऍमेझॉन'ने म्हटले आहे. "जंगली'मुळे भारतीय ऑनलाइन बाजारपेठेतील ई कॉमर्सला यामुळे आणखी चालना मिळणार आहे. सध्या भारतात 46 हजार कोटींची ई कॉमर्सची बाजारपेठ आहे. प्रामुख्याने प्रवासासाठी इंटरनेटवरून तिकिटे विकत घेण्याच्या व्यवहारात भारतीय यूजर्स आता पुरेसे सरावले आहेत. गेल्या दोन वर्षांत इंटरनेटवरून वस्तू विकत घेण्यासही मोठ्या प्रमाणात सुरवात झाली.

युरोपातील तेजीमुळे शेअर निर्देशांकात वाढ

मुंबई - परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) कॅपिटल गुड्‌स आणि धातू क्षेत्रातील ब्लू-चिप शेअरची खरेदी केल्याने शेअर बाजार आज वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 107 अंशांनी वधारून 17,300.58 अंशांवर बंद झाला. जागतिक बाजारपेठेतून, विशेषतः युरोपातून सकारात्मक दिशा मिळाल्याने गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.45 अंशांनी वधारून 5,235.70 अंशांवर बंद झाला. आज सकाळच्या सत्रात आशियातील बाजारपेठांत कमकुवत वातावरण असल्याने शेअर निर्देशांक घसरला होता. मात्र, दुपारी युरोपातील बाजारपेठांत सकारात्मक वातावरण असल्याने शेअर बाजार सावरला.