खोदकामात जलवाहिनी फुटली

टिटवाळ्यात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय म. टा. वृत्तसेवा, कल्याण मांडा-टिटवाळ्यात रस्त्यांची तसेच गटारांची कामे सुरू आहे. गटारे खोदताना पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे या गटाराखालून जाणाऱ्या जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास टिटवाळा विद्यामंदिर शाळेसमोर गटाराचे खोदकाम करताना तीन इंचाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

डॉक्टरची आठ लाखांची फसवणूक

कल्याण : सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या असतानाच एका महिला डॉकटरचीदेखील सिंगापूर येथे नोकरीचे आमिष दाखवून तब्बल सात लाख ७९ हजारांची फसवणूक करण्यात आल्याची घटना कल्याणात उघडकीस आली आहे. या प्रकरणी डॉक्टर महिलेने खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

प्रशासकीय इमारतीचे आज भूमिपूजन

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ अंबरनाथ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज, रविवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे. जुन्या पालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदान आणि पालिका वाहनांच्या गॅरेजच्या जागेवर ही प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. प्रशासकीय इमारतीच्या पाया खोदकामाला सुरुवात झाली असून हे एक औपचारिक भूमिपूजन असणार आहे. वर्षभरात अंबरनाथकरांच्या सेवेत नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

स्कायवॉकचा कलगीतुरा

सेना-राष्ट्रवादीत आरोपांच्या फैरी म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे विटावा स्कायवॉकचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. एकदा भूमिपूजन झाल्यानंतरही खासदार मुलाला श्रेय मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांनी पुन्हा भूमिपूजनाचा घाट घातल्याचा आरोप आ. जीतेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर, परवानग्या आणि कार्यादेश नसतानाही भूमिपूजन करून जनतेला मूर्ख बनविल्याची कबुलीच आव्हाड यांनी दिल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले आहे.

खारेगाव चौपाटीला खो

म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे वादग्रस्त पद्धतीने कामाचे कंत्राट दिले गेल्याने ठाणे महापालिकेचा खारेगाव येथील चौपाटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत आला आहे. एका विशिष्ट कंत्राटदारावर कृपाछत्र धरणाऱ्या पालिकेच्या कार्यपद्धतीला प्रतिस्पर्धी कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर या कंत्राटदाराला याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत ‘वर्क ऑर्डर’ देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या कंत्राटावरून आधीच टीकेचे धनी ठरलेले पालिका प्रशासन आता आणखी अडचणीत आले आहे.