देहूत भाविकांची अलोट गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७१वा वैकुंठगमन सोहळा श्री क्षेत्र देहू येथे शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. उन्हाची तमा न बाळगता असंख्य वैष्णवांनी 'तुकोबा-तुकोबा' गजर करीत नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करून बीजसोहळा 'याची देही, याची डोळा' अनुभवला. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इंद्रायणीकाठी दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ, भजन आणि किर्तनांचा जयघोष चालू होता. गोपाळपुऱ्याच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी लोटली होती. सोहळा अनुभवण्यासाठी वैष्णवांचा मेळा आतुर झाला होता.

चार घरफोड्यांत तीन लाखांचा ऐवज चोरीला

म. टा. प्रतिनिधी, पुणेशहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या चोवीस तासांत शिवाजीनगर, लष्कर, सिंहगड व हडपसरमध्ये चार घरफोडीचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत एमजी रस्ता परिसरात राहणारे मिलिंद मेहता यांनी तक्रार दिली आहे. मेहता यांचे एमजी रस्त्यावर शोरूम आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच, १३ हजारांचा ऐवज लंपास केला. तर, दुसऱ्या घटनेत नऱ्हे येथे भरदिवसा घर फोडण्यात आले. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.

डॉ. गो. बं. देगलूरकर यांना ‘पुण्यभूषण’

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'पुण्यभूषण फाउंडेशनच्या (त्रिदल, पुणे) वतीने दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' ज्येष्ठ पुरातत्त्व आणि मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला आहे. संशोधन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देगलूरकर यांचा या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे,' अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे दिली. एक लाख रुपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे.

मावळमधून बारणेंची उमेदवारी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीमावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अनुक्रमे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पालघर आणि मावळ मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत पेच निर्माण झाला होता. युतीच्या जागावाटप झाले तरी या दोन्ही मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत बराच खल झाला. अखेरीस, बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि बारणे यांच्यातील लढत रंगतदार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपचा उमेदवार प्रतीक्षा यादीत का?

म. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या निवडणुकीत तीन लाखांचे मताधिक्य, विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवाराची कमतरता आणि मतदारसंघात वेगाने झालेली विकासकामे, असे पाठबळ असतानाही भारतीय जनता पक्षाच्या पुण्याच्या उमेदवाराची निवड नेमकी कशामुळे अडली, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर शहरात सुरू होती. संभाव्य उमेदवारांपैकी एका उमेदवाराबाबत पक्ष नेतृत्वामध्येच अद्याप एकमत झाले नसल्याने पुणे लोकसभेचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भाजपने गुरुवारी रात्री लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. त्यात, राज्यातील १६ जागांवरील उमेदवारांचा समावेश आहे; पण त्यात पुण्याच्या उमेदवाराचे नाव नाही.