घरे पाडू नका; टाकळीत रास्ता रोको

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील घरे पाडू नयेत, या मागणीसाठी शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनानंतर गावकऱ्यांनी तहसीलदार संगीता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. टाकळी कोलते येथील अतिक्रमण काढून घेण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी नोटीस देऊन दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अतिक्रमण काढून टाकले जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे गावांत चिंतेचे वातावरण आहे. टाकळी कोलते येथील अतिक्रमणाचा मुद्दा अनेक दिवसांपासून चालू सुरू आहे. बाजार पट्टीतील अतिक्रमण पडल्यापासून हा मुद्दा गाजत असून अनेकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे.

​ कोठडीतील आरोपीच्या मृत्यूची चौकशी सुरू

म. टा. प्रतिनिधी, लातूर लातूरच्या एमआयडीसी ठाण्यात दरोडाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला आरोपी नरेंद्रसिंह हाडियाल (रा. मेहसाना) याचा १५ ऑक्टोंबर रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत तपासात मयत आरोपीने शौचालयामधील क्लीन अॅसिड पिऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी आरोपीला मारहाण केलेली नाही. मयताकडे टॉयलेट क्लीन अॅस‌िड कसे गेले याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. केसचा पुढील तपास सीआयडी क्राइमकडे आहे.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक डॉ. आरतीसिंह यांनी गौरव केला. या पोलिसांना सोमवारी एका कार्यक्रमात विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत गुन्ह्याच्या तपासकामात उत्साह वाढावा या करिता उत्कृष्ट तपास करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम कार्डची अदलाबदल करून शंभर लोकांची पन्नास लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पकडली होती.

जिल्हा परिषदांच्या अधिकारास कात्री

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यातील जिल्हा परिषदांचे अधिकार (स्वायत्ता) राज्य सरकार कमी करत आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केला आहे. सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांची परिषद घेऊन सरकारच्या या धोरणाचा निषेध करावा, महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसारच अधिकार ठेवण्याचे कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत हा विषय सविस्तर मांडून अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यासाठीच लागू आहे.

असमान पाणी वाटपाने छावणीत संताप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद छावणीतील पाणी पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. महापालिका व छावणी परिषदेच्या टँकरद्वारे पाणी वाटप सुरू असले तरी निम्म्या वॉर्डातील नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘मटा’कडे नोंदविल्या. जवळच्यांना भरपूर पाणी, तर इतरांना टँकरपासून दूर ठेवले जात आहे, असे दिसून आले. दरम्यान, पाइपलाइनची दुरुस्ती सोमवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार असा सवाल करण्यात येत आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे १० नोव्हेंबरपासू छावणी परिसरात गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे.