१ जूनपासून रोज २०० नॉन एसी ट्रेन धावणारः रेल्वेमंत्री पियुष गोयल

नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीत मजूर विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. आता रेल्वेने अशा मजुरांना दिलासा दिला आहे. श्रमिक विशेष ट्रेननंतर रेल्वेद्वारे १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी ट्रेन चालवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलीय. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग करता येणार आहे, असंही गोयल यांनी स्पष्ट केलंय.रेल्वेद्वारे १ जूनपासून रोज २०० नॉन एसी ट्रेन चालवल्या जातील. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग होईल. लवकर या ट्रेनसाठी बुकींग सुरू होईल. याची माहिती रेल्वेकडून दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून सांगितलंय.

यूपीत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पोलिसांनी केली उचल बांगडी

लखनऊः काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गाधी यांचे स्वीय सचिव संदीप सिंह आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याविरोधात लखनऊतील हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी आग्रा-राजस्थान सीमेवर धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लल्लू यांची उचल बांगडी करून पोलीसांनी हटवले. स्थलांतरीत मजुरांसाठी बस सोडण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनाला बसले होते. या बसेसना उत्तर प्रदेशात परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत होते.

नेपाळचा नवा नकाशा; भारताच्या भूभागावर केला दावा

वृत्तसंस्था, काठमांडू: भारताचा शेजारी देश नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली असून भारताच्या भागावर दावा केला आहे. लिपुलेख भागावरून नेपाळने भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. या सीमा प्रश्नावरून भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली. या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताच्या हद्दीतील आहेत.

क्वारंटाइन सेंटरमध्ये थिरकल्या बारबाला, व्हिडिओ व्हायरल

समस्तीपूरः करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतत आहेत. बिहारमध्येही ट्रेनने, बसने आणि चालत मजूर दाखल होत आहेत. पण राज्यात गेल्यावर या मजुरांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. अशाच एका क्वारंटाइन सेंटरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत बारबाला नाचताना दिसत आहेत.बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विभुतीपूर प्रखंड येथील देशरी कर्रख पंचायतीच्या क्वारंटाइन सेंटरमधील हा व्हिडिओ आहे. एका शाळेत हे क्वारंटाइन सेंटर बनवण्यात आलं आहे. अनेक स्थलांतरीत मजुरांना येथे क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

'सुपर सायक्लोन'चा प. बंगालला धोका; ३ लाख नागरिकांना हलवले

नवी दिल्लीः बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ (सुपर सायक्लोन) काही तासांनी भारताच्या समुद्र किनारपट्टीला धडकणार आहे. या सुपर सायक्लोनला 'अम्फान' असे नाव देण्यात आले आहे. १९९९ ला असे 'सुपर सायक्लोन' आले होते. आता २१ वर्षांनी दुसऱ्यांदा 'सुपर सायक्लोन' भारताच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलालाही अलर्ट करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत ३ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलीय. यावेळी देश एकाच वेळी दुहेरी संकटाचा सामना करतोय.