लगेज चार्ज वाचवण्यासाठी त्यानं 'हे' केलं!

केफ्लविक: विमानातून प्रवास करताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो 'लगेज'च्या वजनाचा. तुमच्या सामानाचे वजन एखाद्या किलोनेही जास्त झाले तर अधिकचे पैसे मोजावे लागतात. परंतु, या समस्येवर मात करण्यासाठी एका ब्रिटीश युवकाने नामी शक्कल लढवली. ही जादाची रक्कम द्यावी लागू नये म्हणून त्याने प्रवासात पँट आणि शर्टचे १० जोड चक्क आपल्या अंगावर चढवले. रेयान कार्ने विलियम्स असे या युवकाचे नाव असून त्याला आइसलँड ते लंडन असा प्रवास त्याला करायचा होता. सामानाचे वजन कमी व्हावे म्हणून त्याने ८ पँट आणि १० शर्ट एकावर एक घातले. परंतु, केफ्लविक विमानतळावर ब्रिटिश एअरवेजच्या अधिकाऱ्यांकडून त्याला अडवण्यात आले.

रशियात उणे ६७ तापमानाची नोंद

मॉस्को: सर्वसामान्य थर्मामीटरही मोजू शकत इतकी मोठी तापमानातील घट रशियातील याकुता भागात नोंदवण्यात आली आहे. याकुता विभागातील काही भागांमध्ये तर उणे ६७ अंश सेल्सिअस ( उणे ८८.६ डिग्री फॅरनहाइट) इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. याकुता भागातील नागरिकांच्या डोळ्यांच्या पापण्याही गोठल्या असल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर इथल्या तापमानाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. याकुता भागातील विद्यार्थी जास्तीतजास्त उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात नेहमीप्रमाणे शाळेत जात असतात. मात्र आज याकुता भागातील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्याचे जाहीर केले आहे.

ट्रम्प म्हणजे भुंकणारा कुत्रा : उ. कोरिया

सोल : कॅनडात एकीकडे भारत-अमेरिकेसह २० देशांचे प्रतिनिधी कोरियाच्या संकटावर उपाय शोधत असताना, उत्तर कोरिया मात्र शांततेचे सगळे प्रयत्न उधळून लावत आहे. मंगळवारी उत्तर कोरियाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टि्वटरवरून केलेल्या टिप्पणीची तुलना 'कुत्र्याच्या भुंकण्याशी' केली.

लष्करप्रमुख रावत यांच्या वक्तव्याने चीन खवळला

पेइचिंग: दहशतवाद आणि घुसखोरीबाबत भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर चीनमध्येही खळबळ उडाली आहे. रावत यांचे वक्तव्य सकारात्मक नसल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने आपले लक्ष पाक सीमेवरून हटवून आता ते चीन सीमेवर केंद्रीत करण्याच गरज आहे असे वक्तव्य रावत यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. भारतीय लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य दोन्ही देशांच्या नेत्यांमधील संबंध रुळावर आणण्याच्या, तसेच सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या विरोधात असल्याचेही चीनने म्हटले आहे.

'हे' चुकीचे बटन दाबल्याने डागले गेले क्षेपणास्त्र

वॉशिंग्टन : क्षेपणास्त्र डागण्यावरून सध्या अनेक देश एकमेकांना धमकावत असताना एका अफवेने अमेरिकेत सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. अमेरिकेतील प्रमुख राज्य असणाऱ्या हवाईत क्षेपणास्त्र डागल्याचा मेसेज मोबाईलवर चुकून पाठवण्यात आला आणि क्षणातच सर्वत्र भीतेचे सावट पसरले. हवाईतील नागरिकांच्या मोबाईलवर सकाळी ८ च्या दरम्यान एक आपत्कालीन मेसेज आला. 'अमेरिकेतील हवाई भागाच्या दिशेने बॅलिस्टिक मिसाईल येण्याची भीती आहे. तातडीने योग्य ठिकाणी आश्रय घ्या. ही कोणतीही ड्रील नाही.' असे त्यात म्हटले होते. ही कोणतीही ड्रील नाही असे मेसेजमध्ये लिहिण्यात आल्याने नागरिकांचा अधिक थरकाप उडाला.