serena williams : हातची संधी गमावल्याने सेरेना गारद

वृत्तसंस्था, मेलबर्नकारकिर्दीतील २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी अमेरिकेची टेनिपटू सेरेना विल्यम्सला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील तिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सातव्या सीडेड कॅरोलिना प्लिस्कोव्हाने सेरेनाची झुंज ६-४, ४-६, ७-५ अशी परतवून लावत उपांत्य फेरीत धडक मारली. सेरेनाने पहिला सेट गमावला होता. त्यातून सावरत तिने दुसरा सेट जिंकून निर्णायक सेटमध्ये ५-१ अशी आघाडी मिळवली होती. तिच्याकडे चार मॅच पॉईंट्सही होते; मात्र प्लिस्कोव्हाने यातून सावरत पुढे सलग सहा गेम जिंकून सेरेनाच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला.

पावसामुळे, नव्हे उन्हामुळे खेळ थांबला

नेपियर : पावसामुळे किंवा अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आल्याच्या घटना क्रिकेटमध्ये नेहमीच घडत असतात. मात्र, उन्हामुळे खेळ थांबविण्यात आल्याची घटना प्रथमच क्रिकेटमध्ये घडली आहे. भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या पहिल्या वन-डे सामन्यात उन्हामुळे खेळ अर्धा तास थांबविण्यात आला होता.न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १० षटकांत १ बाद ४४ धावा केल्या होत्या. या वेळी धवन आणि कोहली मैदानावर होते. डोळ्यांवर सूर्यकिरण येत असल्याने फलंदाजांना गोलंदाजांचा सामना करताना अडचण येत होती. फलंदाजांनी तशी तक्रार पंचांकडे केली. कुठलाही धोका नको म्हणून पंचांनी अर्धा तास खेळ थांबविण्यात आला.

भारताचा विजय

वृत्तसंस्था, नेपियरऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आपला विजयी सिलसिला भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातही कायम राखला. कुलदीप यादवची अचूक फिरकी, महंमद शमीचा भेदक मारा यानंतर शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट आणि ८५ चेंडू राखून सहज विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा डाव ३८ षटकांत १५७ धावांत रोखला. यानंतर विजयी लक्ष्य २ विकेटच्या मोबदल्यात ३४.५ षटकांत पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.येथील मॅकलीन पार्कवर ही लढत झाली.

शरद मिश्राची अष्टपैलू कामगिरी

म.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूरशरद मिश्राच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर लोकमत संघाने गतविजेत्या तरुण भारत संघाचा ३५ धावांनी पराभव करत आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्या (एसजेएएन) आणि ओसीडब्लू व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या लढतीत नाणेफेक जिंकत लोकमतने फलंदाजीचा निर्णय घेतला व निर्धारित २० षटकांत ७ बाद १८५ अशी मजल मारली. संघाकडून शरद मिश्राने पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली.

Virat Kohli: शेवटच्या दोन वनडेतून विराटला विश्रांती

नवी दिल्ली :न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि त्यानंतर होणाऱ्या टी-२० मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.बीसीसीआयने आज एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांतील व्यस्त वेळापत्रक ध्यानात घेऊन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.कोहलीच्या जागी संघात अन्य खेळाडूचा समावेश केला जाणार नाही.