आयपीएल : पुण्याने मुंबईचा अश्वमेध रोखला!

मुंबई : आयपीएलच्या रणांगणात चौखूर उधळलेला मुंबई इंडियन्सचा अश्वमेध अखेर रायझिंग पुणेनंच रोखला. वानखेडेवरच्या आजच्या सामन्यात पुण्यानं मुंबईवर तीन धावांनी मात केली आणि मेन्टॉर सचिन तेंडुलकरला विजयाचं बर्थ डे गिफ्ट देण्याचा रोहित शर्माचा बेत हाणून पाडला. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सचा सलग सहा विजयांनंतर हा पहिलाच पराभव ठरला.

उपोषण मागे घ्या, कालव्यात उतरुन भाजप खासदाराने हात जोडले!

सोलापूर : आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकनांना भेटण्यासाठी भाजपचे खासदार शरद बनसोडे यांना कालव्यात उतरण्याची कसरत करावी लागली. एवढंच नव्हे, तर खासदार बनसोडेंनी आंदोलकांना हात जोडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
सोलापुरात आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी गेले आठ दिवस जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख उपोषणाला बसले आहेत. आठ दिवसांपासून अन्न सेवन न केल्याने देशमुख यांची प्रकृती खालावली. देशमुखांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला.

केंद्राला पर्यावरणाशी घेणं-देणं नाही, मुंबई हायकोर्टाची नाराजी

मुंबई : केंद्र सरकारला पर्यावरण संवर्धनाशी काही घेणं-देणं नाही. मेट्रो-3 बाबत वारंवार विचारणा करूनही केंद्रीय पर्यावरण, वन विभाग यांच्याकडून उत्तर येत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल यांना 3 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर

पिंपरी चिंचवड : पंढरीच्या आषाढी वारीचा सोहळा जाहीर झाला आहे. तुकोबांच्या पालखीचं 16 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, तर 17 जूनला माऊलींची पालखी निघणार आहे.
अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची ते आतुरतेनं वाट पाहत असतं, त्या आषाढी वारीचा धार्मिक सोहळा जाहीर झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच 16 जूनला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच 17 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.